HSC Sociology Paper: असा सोडवा बारावी समाजशास्त्र विषयाचा बोर्डाचा पेपर; वस्तुनिष्ठ प्रश्नाचे 2 चाचणी

HSC Sociology Paper: विद्यार्थी मित्रहो आता लवकरच इयत्ता बारावी बोर्डाचा समाजशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. त्यासाठी HSC Sociology Paper  कसा लिहावा हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे प्रत्येक प्रश्न कसा सोडवावा याविषयी उदाहरण सह देण्यात आले आहे. सोबतच दोन वस्तुनिष्ठ प्रश्नाचे चाचणी देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वस्तुनिष्ठ चाचणी सोडवा 

12वी समाजशास्त्र वस्तुनिष्ठ सराव -1

12वी समाजशास्त्र वस्तुनिष्ठ सराव -2

असा सोडवा भूगोल विषयाचा पेपर 

HSC Sociology Paper

प्रश्न 1 (अ)  कंसांतील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा व वाक्ये पुन्हा लिहा (एकूण गुण 05)

  • हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे.
  • त्याअंतर्गत प्रश्नपत्रिकेतील पाच विधानांखाली दिलेल्या तीन पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करावी.
  • खालीलप्रमाणे उदाहरण दिल्या प्रमाणे पूर्ण विधान पुन्हा  लिहायचे असते.
  • प्रत्येक अचूक विधानास 1 गुण असून एकूण गुण 05 आहेत

उदाहरण प्रश्न : बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ …….. या भाषेत लिहलेला आहे.

(पाली, अर्धमागधी, संस्कृत)

उत्तर : बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ  पाली  या भाषेत लिहलेला आहे.

HSC Sociology Paper Question 1

प्रश्न 1 (ब) चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा

  • प्रश्न 1 (ब) हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे.
  • या प्रश्नामध्ये प्रत्येकी पाच गटांमध्ये चार जोड्या दिलेल्या असतात.
  • प्रथम दिलेल्या जोडीपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखावे.
  • अचूक जोडी उत्तर म्हणून लिहावी. प्रत्येक अचूक जोडीस 01 गुण; असे एकूण गुण 05 असतात.

 उदाहरण प्रश्न (1)

  1. तंबाखू – निकोटीन
  2. मद्य – इथेनॉल
  3. व्हाइटनर – ट्रायक्लोरोइथेन
  4. खोकल्याचे औषध – चरस

उत्तर: चुकीची जोडी

(iv) खोकल्याचे औषध – चरस

दुरुस्त जोडी

(iv) खोकल्याचे औषध – कोडेन

प्रश्न (1) क:  चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानांपुढे पुन्हा लिहा

  • पहिल्या प्रश्नातील या उपप्रश्नाचे स्वरूप योग्य जोड्या जुळवा प्रमाणे आहे.
  • चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखावी
  • ती दिलेल्या विधानांपुढे पुन्हा लिहावयाची आहे.
  • प्रत्येक अचूक जोडीस 01 गुण; एकूण 05 गुण असतात.

[लोकशाही, देवराई, अॅनी बेझंट, सेल्फायटिस, गुप्त कालखंड]

उदाहरण प्रश्न : होमरूल चळवळ

उत्तर: अॅनी बेझंट

प्रश्न (1) ड:  अधोरेखांकित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा गुण 05

  • पहिल्या प्रश्नातील या उपप्रश्नात प्रत्येक विधानात अधोरेखित शब्द दिलेला असतो.
  • अधोरेखित केलेला शब्द हा चुकीचा असतो.
  • तो शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहायचा असतो.
  • प्रत्येक अचूक उत्तरास 01 गुण; असे एकूण गुण 05 असतात.

उदाहरण प्रश्न : शहरी समुदायातील व्यक्तीचा दर्जा बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचा असतो.

उत्तर : शहरी समुदायातील व्यक्तीचा दर्जा बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचा असतो.

HSC Sociology Paper Question 2

प्रश्न 02 टिपा लिहा (कोणत्याही दोन )

  • प्रश्नपत्रिकेतील हा एक लघूत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे.
  • याअंतर्गत प्रश्नपत्रिकेत दिलेल्या 03 प्रश्नांपैकी कोणत्याही 02 बाबींवर टिपा लिहिणे अपेक्षित आहे.
  • प्रत्येक टिपेत किमान चार मुद्दे अपेक्षित आहेत.
  • या प्रश्नांतील समाविष्ट बाबींवर उदाहरणासहित संज्ञा स्पष्ट करावी.
  • या प्रकारचा प्रश्नही विचारला जाऊ शकतो.
  • प्रत्येक अचूक टिपेस 04 गुण असतात; असे एकूण गुण 08 गुणसाठी हा प्रश्न असतो.

उदाहरण प्रश्न : बौद्ध धर्म

उत्तर : 

  1. गौतम बुद्धांनी ‘चार आर्यसत्ये’ आणि ‘अष्टांगमार्गा’ वर आधारित मध्यमार्गाचा उपदेश केला.
  2. बुद्धांना ‘देव’ ही संकल्पना मान्य नव्हती. ‘तिपिटक’ (त्रिपिटक) हे बुद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ ‘पाली’ या लोकभाषेत लिहिलेले आहेत.
  3. बुद्धा यांनी ‘भिक्खूसंघाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले. व्यक्तिगत आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करणे, हे भिक्खू आणि भिक्खूसंघाचे महत्त्वाचे कार्य होते.
  4. बौद्ध धर्माचा प्रसार मौर्य सम्राट अशोकाच्या आश्रयामुळे भारताच्या सीमा ओलांडून अनेक प्रदेशांमध्ये झाला.
  5. बौद्ध धर्मात हीनयान व महायान हे दोन पंथ होते; वज्रयान हा पंथ ८व्या शतकात उदयाला आला.

HSC Sociology Paper Question 3

प्रश्न 3 फरक स्पष्ट करा: (कोणतेही तीन)

  • या प्रश्नाअंतर्गत प्रश्नपत्रिकेतील पाचपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहावयाची असतात.
  • प्रत्येक प्रश्नांत परस्परांशी निगडित बाबीतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करणे अपेक्षित आहे.
  • प्रत्येक फरकास 01 गुण आणि एक पूर्ण  प्रश्नास 04 गुण; असे एकूण गुण 12 असतात.

उदाहरण प्रश्न : सामाजिक समस्या आणि वैयक्तिक

सामाजिक समस्या वैयक्तिक समस्या 
व्याख्या 
जी समस्या समाजातील असंख्य व्यक्तींना ग्रासते, तिला सामाजिक समस्या असे म्हणतात. जी समस्या एखादया व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला ग्रासते, तिला वैयक्तिक समस्या असे म्हणतात.
व्याप्ती
सामाजिक समस्येची व्याप्ती व्यापक असते. वैयक्तिक समस्येची व्याप्ती मर्यादित असते.
उपाययोजना 
सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. त्या समस्या सोडवण्यासाठी काही वेळेला शासनाला हस्तक्षेप करावा लागतो आणि त्यासंबंधीचे कायदे करावे लागतात. वैयक्तिक समस्यांचे निराकरण संबंधित व्यक्तीने व त्याच्या कुटुंबाने करावयाचे असते. त्या समस्या सोडवण्यासाठी काही सामाजिक संस्था कार्य करतात.
उदाहरण
नववधूदहन, हुंडापद्धत इत्यादी सामाजिक समस्या आहेत शारीरिक व मानसिक आजार, व्यसनाधीनता इत्यादी वैयक्तिक समस्या आहेत.

 

HSC Sociology Paper Question 4

प्रश्न. 4 पुढील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा (कोणतेही दोन)

  • या लघूत्तरी प्रश्नप्रकारात तीनपैकी दोन संकल्पना सोदाहरण स्पष्ट करणे अपेक्षित आहे.
  • प्रत्येक संकल्पनेस उदाहरण देणे आवश्यक आहे.
  • या प्रश्नप्रकारातील संकल्पना टिपा लिहा या प्रश्नांतर्गत विचारल्या जाऊ शकतात.
  • संकल्पनेच्या स्पष्टीकरणास 03 गुण; तर उदाहरणास 01 गुण मिळेल. प्रत्येक उत्तरास 04  गुण; एकूण गुण 08 असतात.

उदाहरण प्रश्न: पर्यावरण चळवळ

उत्तर :  

  1. पर्यावरणवाद हे एक व्यापक तत्त्वज्ञान आहे जे आपल्या सभोवतालच्या परिसराच्या संवर्धन आणि विकासाला केंद्रीभूत मानून पर्यावरण आणि संस्कृतीच्या सुधारणेसाठी कळकळीचे प्रयत्न करते.
  2. गाडगीळ आणि गुहा यांनी पर्यावरण चळवळ याची व्याख्या अशी केली आहे की, “नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय.”
  3. पर्यावरण चळवळीसाठी हरित चळवळ, संवर्धन चळवळ या संज्ञा वैकल्पिकरीत्या वापरल्या जातात.
  4. उदाहरण : सुंदरलाल बहुगुणा यांची चिपको चळवळ, व मेधा पाटकरांचे नर्मदा बचाव आंदोलन.

HSC Sociology Paper Question 5

प्रश्न 5. (अ): संकल्पना चित्र पूर्ण करा प्रत्येकी 01 गुण; एकूण गुण 04

  • प्रश्नपत्रिकेतील प्रश्न. क्रमांक (अ) हा प्रश्न क्रमांक  (04) शी निगडित लघूत्तरी प्रश्न आहे.
  • यामध्ये पाठातील एका मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित दिलेली चित्ररूप आकृती पूर्ण करणे अपेक्षित असते.
  • त्यात एका संकल्पनेशी निगडित 04  रिकाम्या जागा भरून संकल्पना चित्र पूर्ण करणे अपेक्षित असते.
  • प्रत्येक पूर्ण केलेल्या रिकाम्या जागेस 01 गुण; संपूर्ण संकल्पनाचित्रास गुण 04 असतात.

जसे खालील चित्रात दिल्याप्रमाणे

HSC Sociology Paper Question 5

प्रश्न. 5 (ब) पुढील विधाने सत्य की असत्य (बरोबर की चूक) आहेत, ते कारणे देऊन सांगा

  • या लघूत्तरी प्रश्नप्रकारात तीन विधाने दिली जातील.
  • यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.
  • येथे विधान सत्य / असत्य ओळखून त्याची कारणे लिहिणे अपेक्षित आहे.
  • गुणांची विभागणी विधान सत्य/असत्य ओळखण्यासाठी 01 गुण आणि त्याच्या कारणांना 03  गुण. प्रत्येक प्रश्नास 04 गुण; असे एकूण गुण 08 असतात.

उदाहरण प्रश्न : भारतातील सामाजिक चळवळींचे यश उल्लेखनीय आहे.

उत्तर :

  1. वरील विधान सत्य आहे.
  2. कारणे : भारतातील सामाजिक चळवळींमुळे जनजागृती घडून आली. सामाजिक बदलप्रक्रियेत लोकांचा सहभाग वृद्धिंगत झाला.
  3. या चळवळींनी जनतेच्या समस्या, आकांक्षा व मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या आणि त्याविषयी कृती करण्यासाठी शासनावर दबाव आणला.
  4. या चळवळींनी जनजागृतीबरोबरच लोकशिक्षणाची कामगिरी पार पडली. लोकांना सामाजिक प्रश्न, शासकीय धोरणे, विकासाची विविध प्रारूपे यांचे अनौपचारिकरीत्या शिक्षण दिले.
  5. या चळवळींनी शासनास लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यास भाग पाडले.

HSC Sociology Paper Question 6

प्रश्न 6 (अ)पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (प्रत्येकी 3 गुण)

  • हा उपयोजित स्वरूपाचा प्रश्न आहे.
  • पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या भागात (पाठ्यपुस्तकाच्या शेवटी) दिलेल्या उताऱ्यांपैकी एका उताऱ्यावर प्रत्येकी दोन प्रश्न विचारले जातील.
  • विचारलेल्या या दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.
  • प्रश्नातील मध्यवर्ती संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आणि त्याच्या स्पष्टीकरणात्मक उत्तरासाठी 2 गुण असे प्रत्येकी 3 गुण व प्रश्नास एकूण 6 गुण असतील.

HSC Sociology Paper Question 6

प्रश्न. 6 (ब) आपले व्यक्तिगत मत नोंदवा (प्रत्येकी 04 गुण)

  • हा उपयोजित स्वरूपाचा प्रश्न आहे.
  • त्या अंतर्गत दोन विधाने दिली जातील आणि त्यांपैकी एका विधानाविषयी विद्यार्थ्याने व्यक्तिगत मत लिहिणे अपेक्षित आहे.
  • प्रश्नास एकूण 04 गुण आहेत.

उदाहरण प्रश्न : भारतात विविधतेत एकता आढळते.

उत्तर :

  1. भारतात विविधतेत एकता आढळते; या विधानाशी मी सहमत आहे त्याची कारणे पुढीलप्रमाणे:
  2. खंडप्राय भौगोलिक विस्तार असलेल्या भारतात संघराज्यात्मक शासनपद्धती द्वारा प्रादेशिक स्वायत्ततेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मेळ घालण्यात आला आहे.
  3. भारताच्या राज्यघटनेने प्रस्थापित केलेल्या लोकशाही शासनपद्धतीस सर्व जाती धर्म व भाषेच्या लोकांनी स्वीकृती दिली आहे.
  4. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, प्रत्येक धर्माच्या अनुयायांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. धार्मिक अल्पसंख्याकांना आपली संस्कृती, भाषा व लिपीच संवर्धन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

HSC Sociology Paper Question 7

प्रश्न. 7 पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर 150 ते 200 शब्दांमध्ये लिहा : (प्रत्येकी 10 गुण)

  • हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे.
  • प्रश्नात दोन पर्यायी प्रश्नांतून एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दांत लिहिणे अपेक्षित आहे.
  • प्रश्नास 10 गुण आहेत.
  • एका मुद्द्यास 01 गुण या परिमाणानुसार उत्तरात सामान्यतः दहा मुद्दांचा समावेश असावा. एकूण गुण 10.

उदाहरण प्रश्न:  व्यसनाधीनतेची कारण लिहून, त्याचे परिणाम स्पष्ट करा

उत्तर: व्यसनाधीनतेची करणे

  1. व्यक्तिगत कारणे
  2. समवयस्कांचा दबाव
  3. सामाजिक प्रतिष्ठा
  4. स्वचे पुष्टीकरण
  5. मानसिक अवस्था

व्यसनाधीनतेची परिणाम

  1. मानसिक परिणाम
  2. कुटुंबावर होणारा परिणाम
  3. आरोग्यावर होणार परिणाम
  4. कामावर होणार परिणाम
  5. आर्थिक परिणाम
  6. एकाकीपण

अशा प्रकारे पेपर सोडवावा

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा

Leave a Comment

error: कॉपी करताय???