National Science Day: 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन. सी. व्ही. रामन या जगविख्यात भास्तीय शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या प्रकाशाचे विकिरण या विषयातील शोधाला ‘रामन इफेक्ट’ असे नाव दिले गेले. हे संशोधन मूलभूत संशोधन म्हणून समजले जाते. या संशोधनानंतर त्याचा वापर होऊन अनेक संशोधने केली गेली. 1954 मध्ये या शास्त्रज्ञाला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला. अशा थोर शास्त्रज्ञाच्या कार्याची ओळख या लेखातून करून दिली आहे.
National Science Day 2025: सी. व्ही. रामन यांचा प्रकाश विकिरणाचा शोध आणि राष्ट्रीय विज्ञान दिन
National Science Day: सी. व्ही. रामन यांचा प्रकाश विकिरणाचा शोध आणि राष्ट्रीय विज्ञान दिन
आपल्या देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतके नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. त्यात डॉक्टर चंद्रशेखर रामन अग्रभागी आहेत. आपल्या 66 वर्षांच्या शास्त्रीय कारकिर्दीत त्यांनी लहान-मोठे 450 संशोधनात्मक शोधनिबंध लिहिले होते. प्रकाशाचे विकिरण हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. महागड्या आणि भपकेबाज उपकरणांचा डॉक्टर रामन यांना एकप्रकारे तिटकारा होता. वैज्ञानिकांनी संशोधन हे एक व्रत म्हणून स्वीकारावे असे त्यांचे मत होते.
National Science Day
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला डॉ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मरणार्थ National Science Day साजरा केला जातो. रामन यांनी आपल्या शोधाची घोषणा 28 फेब्रुवारी, 1928 या दिवशी केली, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करावा, अशी इच्छा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या मनात आली. 1987 या वर्षी ते विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव म्हणून काम बघत होते. त्यावेळी त्यांनी विविध उपाय योजना सुरू केल्या होत्या. लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी National Science Day साजरा करण्याचे सुरू केले.
सी. व्ही. रामन यांचा जन्म
डॉ सी. व्ही. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1988 मध्ये झाला. त्यांचे वडील विज्ञानाचे शिक्षक होते. चंद्रशेखर रामन 1904 मध्ये बी. ए. झाले आणि 1907 मध्ये एम. ए. झाले. गणित व शास्त्र हे त्यांचे अत्यंत आवडीचे विषय होते. या दोन विषयांत त्यांनी वर्गात प्रथम क्रमांक मिळवला. यावरून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची ओळख होते.
सी. व्ही. रामन यांचे संशोधन
सृष्टीतील रंगांबद्दल त्यांना अतिशय कुतूहल होते. रंगांबद्दल ते संशोधन करत. भारतातील अनेक विद्यापीठांतून त्यांची व्याख्याने होत. त्यामुळे तरुण मुला-मुलींना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होई. श्री. रामन यांनी आपण केलेले संशोधन सर्वांपर्यंत पोहोचवले. तरुण वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनामुळे खूपच लाभ झाला. त्यांनी प्रकाश लहरींचे संशोधन केले. वेगवेगळ्या पदार्थांच्या रेणूंमुळे प्रकाशकिरण विवर्तित होताना प्रकाशलहरींची लांबी बदलत असते. यालाच रामन इफेक्ट किंवा रामन परिणाम म्हणतात. यासाठी त्यांनी सतत सात वर्षे संशोधन करून काही निष्कर्ष काढले. या संशोधनाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शोधून काढलेला सिद्धांत हा मूलभूत आहे.
पदार्थातील रेणू आपल्या आसाभोवती वेगाने गिरक्या घेत असतात. या गिरक्यात कंपनेही असतात. या कंपनात ऊर्जा असते. या ऊर्जेची देवाण-घेवाण झाल्यामुळे प्रकाशाच्या तरंगाची लांबी कमी-जास्त होऊ शकते. या वाढ-घटीचे अचूक मोजमाप घेऊन रेणूंच्या संरचनेचा चांगला अभ्यास होऊ लागला. रामन परिणाम वापरून रेणूच्या संरचनेची धाटणी ठरवण्याचे काम अनेक शास्त्रज्ञांना प्रेरणादायी ठरले.
डॉ रामन यांनी विद्युत क्षेत्रातही संशोधन केले. तरल संवेदनांची उपकरणे तयार करण्याचा त्यांनी उपक्रम केला, त्यांच्या प्रेरणेने बंगलोरला अकॅडमी ऑफ सायन्सची स्थापना 1944 मध्ये झाली.
ध्वनिशास्त्रातही त्यांनी मूलभूत काम केले. डोळ्यांना रंग कसे दिसतात? आकाशाचा रंग निळा का? अशा रहस्यमय कठीण प्रश्नांची उकल त्यांनी केली. अनेकांच्या मनातील शंकांचे निरसन त्यांनी केले. फुले, मुले, तारे, गोल, ग्रह, हिरे, मोती रंग-बिरंगी खडे यांचे आकर्षण असणारे रसिक, सहृदय, उदारमतवादी, विज्ञानवादी म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली.
प्रकाशाशिवाय रामन यांनी भौतिकशास्त्र शाखेतील विविध छोटी-मोठी संशोधने केली आहेत. सर रामन हे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे संस्थापक व प्रमुख होते. भारतातील विविध विश्वविद्यालयात या अकॅडमीतर्फे नियमितपणे शास्त्रीय व्याख्याने आयोजित केली जातात व डॉक्टर रामन असेपर्यंत जातीने या व्याख्यानाला हजर राहत आणि देशातील विज्ञान प्रगतीचा कटाक्षाने मागोवा घेत.
सुरुवातीला ते भारत सरकारच्या अर्थखात्यात नोकरीला लागले होते. काही काळ त्यांना कोलकाता या शहरात राहावे लागले. तेथेच त्यांचा भारतीय विज्ञान संवर्धन संस्थेशी जवळचा संबंध आला. आशुतोष मुखर्जीच्या उत्तेजनाने रामन विज्ञानाचे संशोधन करू लागले. तसेच तेथेच त्यांनी विज्ञानावर काही लेख प्रसिद्ध केले. यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू लागले. त्यांच्या संशोधनाला गती प्राप्त झाली. पुस्तकांचे ते वाचन व चिंतन करू लागले. 1924 मध्ये ते कॅनडातील परिषदेला गेले. त्यांच्या व्याख्यानाने तेथील शास्त्रज्ञ अतिशय प्रभावित झाले. अनेक शास्त्रज्ञांच्या भेटीगाठी वाढल्या. विचारांच्या आदान- प्रदानामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडू लागली. त्यांची अलौकिक प्रतिभा पाहून अनेक देशांत त्यांना व्याख्यानांसाठी निमंत्रणे येऊ लागली.
रामन रिसर्च इन्स्टिट्यूट
वयाच्या 75 व्या वर्षी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून निवृत्त झाले. नंतर त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केली. यामध्येही नवीन नवीन प्रकारचे संशोधन सुरू होते. जगातील विज्ञानप्रेमी लोकांनी त्यांचा अनेक वेळेला गौरव केला. ते भारतीय संस्कृतीचे उपासक होते. बालपणी त्यांनी जो धर्मशास्त्राचा अभ्यास केला होता, त्याचा सूक्ष्म परिणाम त्यांच्या अंतःकरणावर झाला होता; त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कर्मातून सौजन्य प्रकट होत असे. त्यांचे राहणे साधे होते आणि विचार मात्र उच्च होते. त्यांनी संगीतावरही काही लेख लिहिले. त्यांचे वीणा व मृदंग याविषर्थीच्या संशोधनाचे लेख ही प्रसिद्ध झाले आहेत.
सी. व्ही. रामन – भारतरत्न ही पदवी
सी. व्ही. रामन यांनी आयुष्यभर विज्ञानाच्या माध्यमातून समाजाची सेवा केली. 1954 मध्ये भारतरत्न ही पदवी त्यांना मिळाली. स्वर्गीय राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते, तेव्हा सर रामन यांना पहिला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांना राष्ट्रपती भवनातून तो पुरस्कार स्वीकारण्याचे अगत्याचे आमंत्रण होते. 1954 च्या जानेवारी महिन्याचा तो शेवटचा आठवडा होता. त्याचवेळी त्यांचा एक विद्यार्थी पीएच.डी. (डॉक्टरेट) चा अभ्यास करीत होता. 31 जानेवारी हा त्या विद्यार्थ्याच्या विद्यापीठात प्रबंध सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. आपल्या विद्यार्थ्याला प्रबंधाच्या सादरीकरणात आपले मार्गदर्शन लागेल, याची रामन यांना कल्पना होती. त्यांनी तो राष्ट्रपती भवनातील झगमगटातला कार्यक्रम टाळला. राष्ट्रपतींच्या आमंत्रणाला त्यांनी नम्रपणे नकार कळवीला. त्यांचे संशोधनाकडे कटाक्षाने लक्ष होते. आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते किती तळमळत याचे हे ज्वलंत उदाहरण होय.
1958 मध्ये रशियाने त्यांना लेनिन पारितोषिक दिले. 1930 मध्ये इंग्लंडमधील रॉयल सोसायटीने त्यांना ह्युजेस पदक दिले.
21 नोव्हेंबर, 1971 रोजी ते इहलोक सोडून निघून गेले; पण त्यांचा कीर्तिदीप अखंड प्रकाशित राहिला आहे. कोणत्याही देशातील शास्त्रज्ञ हा त्या देशासाठी एक अमूल्य रत्नच असतो. आपल्या संशोधनकार्यातून तो आपल्या देशालाच नव्हे, तर साऱ्या जगाला नवी दृष्टी देतानाच, प्रगतीचा मार्ग दाखवत असतो. विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण सर्व संकल्प करूया विज्ञानाची कास धरूया विज्ञानाची आस धरूया